बेशिस्त वाहनचालकांना पुसेगाव पोलिसांचा दणका: ६७ केसेससह ५४ हजारांचा दंड वसूल.

बेशिस्त वाहनचालकांना पुसेगाव पोलिसांचा दणका: ६७ केसेससह ५४ हजारांचा दंड वसूल

पुसेगाव/प्रतिनिधी, अकबर भालदार.
सातारा जिल्हयातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, या उद्देशाने पुसेगाव पोलीस ठाण्याने २१ ऑगस्ट २०२६ रोजी एक विशेष नाकाबंदी मोहीम राबवली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५४,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि नागनाथ खुणे आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. विसापूर फाटा व शिवाजी चौक परिसरात ही विशेष नाकाबंदी करण्यात आली होती.  

या कारवाईदरम्यान केवळ दंडात्मक कारवाईच केली गेली नाही, तर शाळा, कॉलेज आणि एसटी स्टँड परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या 'रोडरोमिओ'वरही कडक कारवाई करण्यात आली. यामध्ये ६ वाहनांचे कर्कश आवाजाचे सायलन्सर आणि ७ प्रेशर हॉर्न जप्त करण्यात आले आहेत.  

सपोनि नागनाथ खुणे यांनी स्पष्ट केले की, भविष्यातही शाळा-कॉलेज परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्यांवर, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध ही कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे.  

सदरची कारवाई सपोनि नागनाथ खुणे, पोलीस उपनिरीक्षक शेख, पोलीस उपनिरीक्षक पुजारी, वाहतूक पोलीस अंमलदार संतोष बागल, बापुराव नवत्रे, राहूल जाधव आणि अविनाश घाडगे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.