जगातील सर्वात तरुण नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांच्याकडून अनोखे रक्षाबंधन.
फलटण शहर पोलीस ठाण्यात पोलीस बांधवांसह महिला पोलिसांना बांधल्या राख्या
फलटण प्रतिनिधी:जुबेरभाई कोतवाल.
रक्षाबंधन हा केवळ सण नसून तो भाऊ बहिणीच्या अनमोल नात्याचा उत्सव आहे ज्यामध्ये बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या सुख, समृद्धी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात
माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून नगरसेविका कु.सिद्धाली शहा यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात पुरुष व महिला पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला.
राखी पौर्णिमेचे औचित्य साधून जगातील सर्वात तरुण नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांसोबत अत्यंत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले.
यावेळी कु.सिद्धाली शहा यांनी पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. तसेच या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही राखी बांधून एक आगळावेगळा आदर्श प्रस्थापित केला. या अनोख्या रक्षाबंधनाबाबत भावना व्यक्त करताना कु. सिद्धाली शहा म्हणाल्या की, "बहिणीचे जो रक्षण करतो, तो भाऊ असतो आणि त्या भावाला बहीण राखी बांधून रक्षाबंधन साजरा करत असते आजच्या काळात महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी सुद्धा समाजासोबतच आम्हा महिलांचे खंबीरपणे रक्षण करतात. त्यामुळे त्यांच्या या कर्तृत्वाप्रती कृतज्ञता म्हणून त्यांनाही राखी बांधून आम्ही हे रक्षाबंधन साजरे केले आहे."
या कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिठू जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक सुनीता शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे यांच्यासह अनेक पोलीस हवालदार व अंमलदार उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी संवाद साधताना एक महत्त्वपूर्ण आवाहन केले. ते म्हणाले की, सर्वसामान्य महिलांना फलटण शहर पोलीस स्टेशन आणि येथील पोलीस अधिकाऱ्यांची ओळख व्हावी, तसेच पोलीस स्टेशनचे सविस्तर कामकाज कसे चालते हे महिलांना कळावे, यासाठी फलटण शहर पोलीस स्टेशन आणि माऊली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशनच्या हॉलमध्येच महिलांसाठी एका विशेष माहितीपर शिबिराचे आयोजन करण्यात यावे. या समाजोपयोगी उपक्रमासाठी फलटण शहर पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
Comments
Post a Comment