कोरेगाव बायपाससाठी डीपीआर तयार करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश.
खासदार नितीनकाका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : सूर्यकांत रावसाहेब बर्गे यांची माहिती
पुसेगाव/प्रतिनिधी, अकबर भालदार.
कोरेगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रस्तावित बाह्यवळण मार्गाच्या मागणीला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा खासदार नितीनकाका पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कोरेगाव बायपास उभारण्याबाबत निवेदन दिले. त्यानंतर गडकरी यांनी संबंधित विभागाला बायपासचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत रावसाहेब बर्गे यांनी दिली.
कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बर्गे यांनी ही माहिती दिली. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष आरिफभाई शेख आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश बर्गे उपस्थित होते.
कोरेगावमधून जाणाऱ्या सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी, मालवाहतूक, अवजड वाहने तसेच ऊस वाहतुकीची मोठी वर्दळ असते. शहरातील दाट लोकवस्ती, शाळा-महाविद्यालये, बाजारपेठ आणि व्यावसायिक आस्थापनांमुळे विशेषतः सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे पादचारी, विद्यार्थी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
बायपास झाल्यास लांब पल्ल्याची व अवजड वाहतूक शहराबाहेर वळविता येणार असून वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका, प्रवासाचा वेळ आणि इंधनाचा अपव्यय कमी होण्यास मदत होणार आहे. डीपीआर तयार करण्याच्या निर्देशामुळे कोरेगाव बायपासच्या मागणीला आता ठोस दिशा मिळाली असून पुढील तांत्रिक प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment