खाकीचा अनोखा संदेश पुसेगाव पोलिसांचा हुशार विद्यार्थ्यांना 'बॅनर' बहुमान!
पुसेगाव/प्रतिनिधी, अकबर भालदार.
चौकाचौकात गुंड, मवाल्यांचे आणि भाई-दादांचे वाढदिवसाचे स्टेटस अन् बॅनर लावून पोरी-बाळींना त्रास देणाऱ्या अन् टवाळकी करणाऱ्यांचे दिवस आता संपलेत! कारण सातारा जिल्हा पोलीस दलाने आणि पुसेगाव पोलीस ठाण्याने थेट गुन्हेगारी प्रवृत्तीच्या छाताडावर पाय देत एक अत्यंत झटकेबाज आणि कौतुकास्पद मोहीम हाती घेतली आहे.
**"चोर, गुंड, मवाल्यांचे बॅनर नका छापू... हुशार विद्यार्थ्यांचे भविष्य बॅनर वरती आखू..!"** असा थेट आणि कडक इशारा व संदेश देत सातारा जिल्हा पोलिसांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे थेट फ्लेक्स लावून त्यांचा जाहीर सन्मान केला आहे. कोरेगाव उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पुसेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे.
**गुंडगिरीच्या संस्कृतीला खाकीची 'चपराक'**
आजकाल गल्लीबोळात दोन-चार गुन्हे दाखल असलेल्या स्वयंघोषित 'भाईं'चे मोठे फ्लेक्स लागतात आणि तरुण पिढी भरकटत जाते. या विकृतीला आळा घालण्यासाठी पुसेगाव पोलिसांनी थेट शिक्षणाचा आणि गुणवत्तेचा सन्मान चौकात आणला आहे. "बॅनर लावायचेच असतील, तर देशाचं भविष्य घडवणाऱ्या हुशार मुलांचे लावा," असा थेट संदेश यातून समाजात गेला आहे.
**हे आहेत पुसेगावचे 'खरे हिरो' (शिष्यवृत्ती विजेते विद्यार्थी):**
पोलीस दलाने कौतुक केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांची नावे आणि त्यांना मिळालेले गुण खालीलप्रमाणे:
* **अर्णव ज्ञानेश्वर धायगुडे** – २७६/३००
* **विघ्नेश मारुती लावंड** – २६४/३००
* **मृण्मयी पंकज पवार** – २६२/३००
* **प्रभात पवन गायकवाड** – २६२/३००
* **गायत्री नितीन घनवट** – २५८/३००
* **प्रणव अनिल सूर्यवंशी** – २५४/३००
* **मृणाल राहुल अडसुळ** – २५६/३००
* **स्पृहा सचिन घनवट** – २५४/३००
* **स्नेहा सुवर्धन जगदाळे** – २५२/३००
* **सार्थक लालबहादूर साळुंखे** – २४४/३००
* **अन्विका सागर जाधव** – २४०/३००
* **आर्यन गणपती पवार** – २४०/३००
* **सृष्टी दीपक मोरे** – २४०/३००
**जनतेतून कौतुकाचा वर्षाव!**
पोलिसांच्या या 'झटकेबाज' पवित्र्यामुळे गुन्हेगारांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे धाबे दणाणले असून, सर्वसामान्य जनतेने मात्र सातारा पोलिसांच्या या भूमिकेचे टाळ्या वाजवून स्वागत केले आहे. "पोलीस असावेत तर असे..." अशीच चर्चा सध्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात रंगली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे हे डिजिटल कौतुक सध्या सोशल मीडियावरही तुफान व्हायरल होत आहे.
Comments
Post a Comment