खामगाव दुर्घटना प्रकरणाला नवे वळण; केबल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल.
फलटण प्रतिनिधी :जुबेरभाई कोतवाल.
फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालेल्या हृदयद्रावक घटनेप्रकरणी पोलिसांनी केबल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात निष्काळजीपणे टाकलेल्या केबलच्या लोखंडी सपोर्ट वायरमुळे हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.दि. ८ जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.३० वाजता खामगाव येथे घरासमोरील लोखंडी तारेचा विजेचा शॉक लागून सतीश ऊर्फ पिसुरडया किसन शिंदे (वय ४५), गंगू सतीश शिंदे (वय ४०), सचिन सतीश शिंदे (वय २६) आणि आरती सतीश शिंदे (वय २४) या चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शीतल सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.घटनेचा पुढील तपास करताना संबंधित घरावरून निष्काळजीपणे केबल टाकण्यात आल्याचे समोर आले. या केबलला आधार म्हणून लावलेली लोखंडी तार घरासमोर खाली पडली होती. त्या तारेचा स्पर्श होताच चौघांना विजेचा जबरदस्त शॉक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले.याप्रकरणी केबलचालक तात्यासो चंदर लांडगे (रा. खामगाव, साखरवाडी, ता. फलटण) याच्याविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४०२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दुर्घटनेत अन्य कोणाचा निष्काळजीपणा अथवा जबाबदारी आहे का, याचाही तपास सुरू असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवानी नागवडे पुढील तपास करीत आहेत अशी माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी दिली.
Comments
Post a Comment