कुत्रा वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात; गिरवी येथील प्रगतीशील तरुण शेतकरी सुनील जाधव यांचे निधन.
पुसेगाव/प्रतिनिधी, पंकज कदम.
फलटण-गिरवी रस्त्यावरील निरगुडी गावच्या हद्दीत भीषण अपघात घडून गिरवी (ता. फलटण) येथील प्रगतीशील तरुण शेतकरी सुनील प्रकाश जाधव (वय ३३) यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे गिरवी परिसरासह संपूर्ण फलटण तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २८) रात्री १० वाजण्याच्या सुमारास सुनील जाधव हे आपल्या दुचाकीवरून जात असताना निरगुडी गावाजवळ अचानक समोर आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची मोटरसायकल रस्त्याकडेच्या एका घराच्या भिंतीवर जाऊन जोरदार धडकली. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.अपघातानंतर त्यांना तत्काळ उपचारासाठी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच गुरुवारी (दि. ३०) दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.
सुनील जाधव हे फलटण भागात एक अभ्यासू आणि प्रगतीशील तरुण शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली जाण्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि एक मुलगा असा परिवार आहे.या घटनेबाबत फलटण तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून, गिरवी बीटचे अमलबजावणी अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Comments
Post a Comment