सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला फलटणमध्ये एकदिवसीय धरणे आंदोलनातून जाहीर पाठिंबा.
फलटण प्रतिनिधी | जुबेर कोतवाल.
लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या जंतर-मंतर, नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी फलटण येथील तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी शिक्षण क्षेत्रातील वाढत्या गैरप्रकारांबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. पेपरफुटी ही केवळ परीक्षा व्यवस्थेतील समस्या नसून शिक्षण व्यवस्थेला लागलेली गंभीर विकृती असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. शिक्षणातील पारदर्शकता आणि गुणवत्तेवर या प्रकारांचा विपरीत परिणाम होत असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला.
आंदोलनकर्त्यांनी वाढते खाजगीकरण, शिक्षणातील असमानता आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम याकडेही लक्ष वेधले. आर्थिकदृष्ट्या सक्षम घटकांना अधिक संधी मिळत असताना गरीब विद्यार्थी मागे पडत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी आंदोलकांनी केली.
या आंदोलनात कालिदास चोरमले, निवृत्ती खताळ, नानासो गोवेकर, वैभवराज नरुटे, नितीन सुळ, गणेश कुंभार, विकास नाळे, सागर गावडे, मंगेश आवळे, कैलास रणदिवे, नाना हुलगे, विशाल माडकर, सोमनाथ मागाडे, सागर काकडे, गोरख सुळ, रोहन डोंबाळे, दादा सुळ, प्रसाद जाधव, निखिल कुचेकर, रामभाऊ पाटोळे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले.
Comments
Post a Comment