मेंदूला सकारात्मक प्राॅम्प्ट द्या, यश नक्कीच मिळेल : डॉ. राजेंद्र मोरे.
पुसेगाव/प्रतिनिधी, अकबर भालदार.
"आपला मेंदू हा आपण दिलेल्या प्रॉम्प्टवर चालतो. मेंदूला जर सकारात्मक आणि योग्य संदेश दिले, तर जगातील कोणतीही अशक्य वाटणारी गोष्ट आपण सहज साध्य करू शकतो. आपण जे ठरवू तेच घडत राहील, फक्त स्वतःला योग्य दिशा देणे महत्त्वाचे आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध समुपदेशक व सेवानिवृत्त सेनाधिकारी डॉ. राजेंद्र मोरे यांनी केले. सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील कर्मवीर सभागृहात आयोजित 'एन्जॉय एक्झाम टेक्निक्स' या एकदिवसीय कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे होते. व्यासपीठावर उपप्राचार्य नंदिनी साळुंखे, रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी एन. टी. निकम, पर्यवेक्षक रवींद्र खोत उपस्थित होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. मोरे म्हणाले की, परीक्षेचा अभ्यास करणे ही अजिबात अवघड गोष्ट नाही. फक्त ती संकल्पना आपल्या मेंदूपर्यंत व्यवस्थित पोहोचली पाहिजे. परीक्षा हा खेळ नसला, तरी आपण आनंदी वातावरणात परीक्षेला सामोरे गेले पाहिजे. विद्यार्थ्यांमधील परीक्षेची अनाठायी भीती, फोबिया दूर करताना त्यांनी ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्सच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण केले. "विद्यार्थी जीवन हे अत्यंत 'फंटास्टिक' आणि मंतरलेले दिवस असतात. स्वतःला कधीही कमी समजू नका. आपला डीएनए कोणाशीही जुळत नाही, त्यामुळे आपले अस्तित्व स्वतंत्र आहे आणि ते आपणच निर्माण केले पाहिजे," असा मौलिक सल्लाही त्यांनी दिला. तसेच शिक्षकांना वारंवार शंका विचारून संकल्पना स्पष्ट करण्याचे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी खाजगी कोचिंग क्लासेसच्या वाढत्या विळख्यावर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "आज अकॅडमीचे आक्रमण झाले असले तरी ही लाट लवकरच ओसरणार आहे. विद्यार्थ्यांनी नियमित कॉलेजला उपस्थित राहून आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. वेळेचे योग्य नियोजन करून मोबाईल व इतर व्यसनांपासून दूर राहावे. आई-वडिलांच्या संस्कारांची शिदोरी सोबत बाळगल्यास तुम्ही जीवनात नक्कीच टॉपर बनाल."
'ओयासिस' टीमकडून कार्यशाळेची सुरुवात अंतर्मनाला ऊर्जा देणाऱ्या प्रार्थना गीताने झाली. पुणे येथील 'ओयासिस कौन्सेलर्स'च्या टीमने विद्यार्थ्यांना अभ्यासाची तंत्रे, सूर्यनमस्काराचे महत्व, संतुलित जीवनशैली, उजळणीचे महत्त्व, गृहपाठ, स्टडी ग्रुपचे महत्त्व आणि आत्मपरीक्षण यांवर अत्यंत रंजक पद्धतीने मार्गदर्शन केले. यावेळी प्रणिती पडवळ, श्रावणी सावंत, श्रावणी जाधव, प्रयाग उबाळे आणि सुजल कदम या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत कार्यशाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन ही कार्यशाळा 'वायसी' महाविद्यालयात १५ आणि १६ जुलै रोजी पुन्हा आयोजित करण्यात येणार असून इच्छुकांनी अधिक माहितीसाठी आयोजकांना संपर्क साधण्याचे आवाहन उपप्राचार्य नंदिनी साळुंखे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमृता वरेकर यांनी केले. प्रा. पी. बी. सरगडे यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी समिती प्रमुख प्रा. विवेक राऊत, 'ओयासिस' टीमचे सचिन पवार, प्रा. अविनाश ढेबे, प्रा. महेश बाबर, प्रा. अश्विनी कुलकर्णी, प्रा. भाग्यश्री नामजोशी, प्रा. विवेक पवार, प्रा. सचिन मांडके, साहिल पवार आदींनी पुढाकार घेतला. कार्यशाळेचा समारोप विद्यार्थी आणि शिक्षकांच्या 'जय हिंद'च्या घोषणांनी तुफान जल्लोषात झाला.
Comments
Post a Comment