समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भोईटे व सामाजिक कार्यकर्ते रमण भोईटे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश.
समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भोईटे व सामाजिक कार्यकर्ते रमण भोईटे यांचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश.
फलटण प्रतिनिधी:जुबेर कोतवाल.
समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश भोईटे आणि सामाजिक कार्यकर्ते रमण भोईटे यांनी राजे गटाची साथ सोडत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे फलटणच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
या पक्षप्रवेशावेळी फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे अध्यक्ष अमरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक संदीप चोरमले, मिलिंद नेवसे, नगरसेवक सचिन अहिवळे तसेच ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेश भोईटे हे सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमुळे फलटणमध्ये परिचित नाव आहे. समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी वारकरी सेवा, आरोग्य शिबिरे, रक्तदान, जनजागृती अभियान, सामाजिक उपक्रम तसेच गरजू नागरिकांना विविध प्रकारची मदत करण्याचे कार्य सातत्याने केले आहे. रमण भोईटे यांनीही सामाजिक बांधिलकी जपत अनेक लोकहिताचे उपक्रम राबवून नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर भोईटे यांनी सांगितले की, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. समाजातील सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी, युवक, महिला आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा आमचा संकल्प आहे. समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू असलेले समाजसेवेचे कार्य यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहील."
यावेळी रमण भोईटे यांनीही सामाजिक एकात्मता, विकास आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी भाजपच्या माध्यमातून अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दोघांचे पक्षात स्वागत करत, त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. समाजात सक्रियपणे काम करणारे कार्यकर्ते पक्षात दाखल झाल्याने भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक ताकद वाढणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
समर्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय मिळवून देणे, सामाजिक एकोपा वाढविणे, युवकांना सकारात्मक दिशा देणे, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि जनजागृतीच्या विविध उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देणे तसेच समाजहिताची चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने कार्य सुरू राहील, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment