एमओएच्या आखाड्याचे आता मुरलीआण्णा वस्ताद:-फिरोज मुलाणी.

एमओएच्या आखाड्याचे आता मुरलीआण्णा वस्ताद:-फिरोज मुलाणी.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

अजित पवार युगानंतर नवा अध्याय सुरू. कुस्ती क्षेत्रात आनंदाचे वातावरण.महाराष्ट्राच्या क्रीडा सत्ताकारणात अखेर मोठा राजकीय बदल घडला आहे.तब्बल तीन टर्म एमओएवर वर्चस्व गाजवणाऱ्या अजित पवार यांच्या युगाला पूर्णविराम मिळाला आहे. दादांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र आॅलम्पिक असोसिएशन (एमओएच्या) अध्यक्षपदाची धुरा केंद्रीय हवाई मंत्री पैलवान मुरलीधर मोहोळ यांच्या हाती आली आहे. अजित पवार युगानंतर एमओए मध्ये नवा अध्याय सुरू झाला आहे.कुस्ती क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनची एकहाती धुरा (एमओए) सलग तीन टर्म अजित पवार यांचेकडे होती. त्यांच्या कार्यकाळात क्रीडा क्षेत्राला एक वेगळी दिशा मिळाली होती. गेल्या वर्षी झालेल्या एमओएच्या  निवडणुकीत प्रथमच मोहोळ यांनी निवडणूकीच्या मैदानात उडी घेत पवार यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान दिले होते. त्यांच्या एंट्रीमुळे एमओएच्या सत्ताकारणात मोठी खळबळ उडाली होती. एमओएच्या आखाड्यात कोण बाजी मारणार याबाबत क्रीडाक्षेत्रात ट्विस्ट निर्माण झाले होते. मुत्सद्दी दादांनी तडजोडीत अध्यक्ष पदावर चौकार मारला होता. मात्र महत्वाची पदे आपल्या ताब्यात ठेवण्यात मुरली आण्णा यशस्वी ठरले होते. त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली होती आणि भविष्यात अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या वाट्याला येणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते.अजित पवार यांच्या अकाली निधनाने एमओए समोर नेतृत्वाचा प्रश्न उभा ठाकला होता.रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी अखेर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या निवडीमुळे एमओएमध्ये केवळ नेतृत्वबदल झाला नाही, तर क्रीडा क्षेत्रात नव्या धोरणांच्या विचारसरणीची सुरुवात झाली असे मानले जात आहे.
पैलवान म्हणून मिळवलेला अनुभव आणि संघटन कौशल्य यांच्या जोरावर खेळाडूंच्या अडचणींची जाण असलेले मोहोळ अध्यक्षपदी आल्यामुळे  क्रीडा क्षेत्राला अधिक बळकटी आणि संघटनांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा क्रीडावर्तुळातून व्यक्त होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी, सुविधा उपलब्ध करून देणे, पायाभूत  क्रीडा सुविधा वाढवणे आणि ऑलिम्पिक स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व मजबूत करणे याकडे त्यांच्या कार्यकाळात विशेष लक्ष दिले जाईल, अशी क्रीडा  क्षेत्रात चर्चा आहे.
*चौकट*
*ग्रामीण खेळाडूंना संधी मिळेल* 
“ मुरलीधर मोहोळ हे स्वतः मैदानातले पैलवान असल्याने त्यांना खेळाडूंच्या अडचणींची जाणीव आहे. एमओएच्या अध्यक्षपदावर एक खेळाडू बसल्याने पदाला न्याय मिळवून देण्यात ते कमी पडणार नाहीत.त्यांच्या नेतृत्वात ग्रामीण भागातील खेळाडूंना नक्की न्याय मिळेल,”
*उत्तमराव पाटील आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक*
 *चौकट*
*पैलवान ते केंद्रीय मंत्री*
मुरलीधर मोहोळ हे मुळचे पुण्याचे असले तरी कोल्हापूरच्या कसबा बावडा शासकीय कुस्ती केंद्रात उत्तमराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कुस्ती करिअरला आकार मिळाला. लाल मातीतून संघटन आणि नेतृत्वाचे गुण घेऊन पुण्यात त्यांनी राजकीय आखाडा गाजवला. महापौर ते खासदार झाल्यावर थेट केंद्रीय हवाई नागरी उड्डाण मंत्री पदावर त्यांनी कर्तृत्वाने झेप घेतली.एमओएची जबाबदारी खांद्यावर आल्याने कोल्हापूरचा पैलवान अध्यक्ष झाल्याचा आनंद कुस्ती क्षेत्रात झाला आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.