सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक वसीम इनामदार यांचे अपघाती निधन; कोरेगावात शोककळा.
कोरेगाव प्रतिनिधी,अज्जू मुल्ला.
कोरेगाव : येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच उद्योजक व आमदार महेश शिंदे यांचे स्वीय सहाय्यक वसीम आयुब इनामदार (वय ३९) यांचे अपघाती निधन झाल्याने कोरेगाव शहर व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी सकाळी कोरेगाव येथील कब्रस्तानमध्ये अत्यंत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ, एक बहीण, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. वसीम इनामदार हे आयुब इनामदार यांचे ते चिरंजीव तर उमर नूरमहंमद जमादार यांचे भाचे होत.
वसीम इनामदार हे आमदार महेश शिंदे यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत होते. त्याचबरोबर ते उद्योजक म्हणूनही परिचित होते. सामाजिक कार्याची विशेष आवड असलेल्या इनामदार यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार व गतीने पूर्ण व्हावीत यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.
दोन दिवसांपूर्वी सातारा येथे कामकाज आटोपून कोरेगावकडे परतत असताना मुगाव फाट्यानजिक त्यांचा अपघात झाला होता. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. सुरुवातीला त्यांच्यावर कोरेगाव येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे, काडसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. सौ. अरुणाताई विजय बर्गे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, नगराध्यक्ष दिपाली बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, सुनील दादा बर्गे यांच्यासह कोरेगावातील आजी-माजी पदाधिकारी, नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
Comments
Post a Comment