हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा कुस्ती शौकीनांसाठी पर्वणी.
विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार.
जिल्ह्यात पहिल्यांदाच स्पर्धेचे आयोजन. पुरुष आणि महिला गटात रंगणार थरार.
सातारा जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेला आता राष्ट्रीय स्तराची झळाळी मिळणार आहे.जिल्ह्यात प्रथमच होत असलेली हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा कुस्ती शौकीनांसाठी पर्वणी ठरणार आहे. पुरुष आणि महिला गटात होणाऱ्या रंगतदार लढतीचा थरार पाहायला सातारा सज्ज झाला आहे.2022 मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या यशस्वी आयोजना नंतर सातारा जिल्हा तालीम संघाने आणखी मोठा डाव टाकला आहे. तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार यांच्या शतकमहोत्सवी वर्षानिमित्त दीपक पवार आणि सुधीर पवार यांनी हिंदकेसरीचा भव्य आखाडा भरवण्याचा घेतलेला निर्धार आता प्रत्यक्ष मातीमध्ये उतरला आहे.देशभरातील मातब्बर मल्लांच्या दमदार हजेरीमुळे साताऱ्याची माती पुन्हा एकदा तापणार आहे, पुरुष आणि महिला गटातील चुरशीच्या लढतीमुळे आखाड्यात डाव, प्रतिडाव, ताकद आणि जिगर यांचा महासंग्राम रंगणार आहे. हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेमुळे कुस्ती शौकीनांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.कुस्तीविश्वात सातारा जिल्ह्याची वेगळी ओळख आहे.हिंदकेसरीसारखी राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा साताऱ्यात होत असल्याने स्थानिक मल्लांना मोठं व्यासपीठ मिळणार आहे. विशेष म्हणजे पुरुष गटासोबतच महिला गटातील मुकाबला रंगणार असल्याने कुस्तीगीर महिलांच्या ताकदीचा आणि जिद्दीचा दमदार खेळ पाहायला मिळणार आहे. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश, राजस्थान दिल्लीसारख्या कुस्तीच्या बालेकिल्ल्यांतील मातब्बर मल्ल साताऱ्याच्या आखाड्यात उतरणार आहेत.स्पर्धेच्या निमित्ताने काही दिवस साताऱ्याची मातीच देशातील कुस्तीविश्वाचे केंद्र ठरणार आहे.
जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रात सर्वत्र हिंदकेसरी स्पर्धेची चर्चा सुरू आहे.स्पर्धेमुळे कुस्ती शौकीनांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. लाल मातीत रंगणारा हा महासंग्राम पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.ही स्पर्धा म्हणजे केवळ आयोजन नाही, तर साताऱ्याच्या कुस्ती परंपरेचा मानाचा फड आहे. साहेबराव भाऊ यांनी आयुष्यभर जपलेल्या लाल मातीच्या संस्कारांना हिंदकेसरीच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे मत जिल्हा तालिम संघाचे जीवन कापले यांनी व्यक्त केले.
*भाऊंनी जपलेल्या कुस्ती संस्कृतीचा गौरव*
“हिंदकेसरी स्पर्धेमुळे सातारा जिल्ह्याच्या कुस्ती परंपरेला राष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळणार आहे. मातीशी नाळ जोडलेल्या हजारो कुस्ती शौकीनांसाठी ही स्पर्धा म्हणजे पर्वणीच ठरणार आहे. कुस्ती महर्षी साहेबराव पवार (भाऊ) यांनी आयुष्यभर जपलेल्या कुस्ती संस्कृतीचा हा गौरव आहे. देशभरातील नामांकित मल्ल साताऱ्याच्या मातीत उतरणार ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.”हिंदकेसरी संतोषआबा वेताळ
*स्थानिक मल्लांना प्रेरणा मिळेल*
“सातारा जिल्ह्याच्या मातीला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. हिंदकेसरीसारखी राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा प्रथमच होत असल्याने जिल्ह्यातील कुस्ती शौकीनांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे. देशभरातील मातब्बर मल्लांच्या लढती पाहण्याची संधी साताऱ्याच्या जनतेला मिळणार असून, या स्पर्धेमुळे स्थानिक मल्लांनाही मोठी प्रेरणा मिळेल.”पै. संदीप मांडवे उपाध्यक्ष सातारा जिल्हा तालिम संघ.
Comments
Post a Comment