फलटणमध्ये गॅस वितरणात मोठा घोळ? ग्राहक त्रस्त, पुरवठा विभागावर प्रश्नचिन्ह.
फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल.
फलटण तालुक्यात गॅस सिलेंडर वितरणात मोठा घोळ उघडकीस येत असल्याचे चित्र समोर येत आहे. ग्राहकांनी बुकिंग केलेले सिलेंडर प्रत्यक्षात मिळत नसताना “डिलिव्हरी पूर्ण” झाल्याचे संदेश मोबाईलवर येत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चर्चा असताना, त्याचा फटका फलटणलाही बसत असल्याचे दिसून येत आहे. मात्र या परिस्थितीत स्थानिक पुरवठा विभाग गॅस वितरणात पारदर्शकता राखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
ग्राहकांचा गंभीर आरोप असा आहे की, बुकिंग केलेले सिलेंडर काही ठिकाणी चढ्या दराने विकले जात आहेत. अधिकृत ग्राहकांना सिलेंडर मिळत नसताना काळाबाजार होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीदेखील यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पुरवठा विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.बुकिंग केलेले सिलेंडर आम्हाला मिळत नाहीत, पण डिलिव्हरी झाल्याचा मेसेज येतो. मग हे सिलेंडर जातात कुठे?” असा सवाल संतप्त ग्राहक विचारत आहेत. जर ग्राहकांना सिलेंडर मिळालेच नाहीत, तर ते नेमके कोणाला दिले जात आहेत, याची चौकशी होणे गरजेचे आहे. या प्रकारामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाला जबाबदार कोण, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.ग्रामीण भागात परिस्थिती अधिकच बिकट असून, अनेक कुटुंबांना गॅस न मिळाल्यामुळे पुन्हा चुलीवर पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करावा लागत आहे.आदरकी (ता. फलटण) येथील रहिवासी अजितकुमार जाधव यांनी सांगितले की,
“मी बुक केलेला सिलेंडर मला मिळालाच नाही, पण तो डिलिव्हर झाला असा मेसेज आला. गॅस कंपनीकडे विचारणा केली असता त्यांनी ‘सिलेंडर मिळाला आहे’ असेच सांगितले. आम्हाला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.”या सर्व प्रकारामुळे फलटण तालुक्यातील गॅस वितरण व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments
Post a Comment