फलटण नगर पालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी नामांतराचा ठराव बहुमताने मंजूर.

फलटण नगर पालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी नामांतराचा ठराव बहुमताने मंजूर.

फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल.

फलटण : फलटण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले व मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेस नगरपरिषदेचे विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्ताधारी खासदार गट व विरोधी राजे गटातील सर्व नगरसेवकांनी सभेत सहभाग नोंदवला.सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. सुरुवातीलाच नगरसेवक विकास काकडे यांनी नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना शासन निर्णयांची माहिती देण्यात यावी, अशी मागणी केली. यावर मुख्याधिकारी यांनी सर्व विषयांची नोंद मिनिट्स बुकमध्ये होत असल्याचे स्पष्ट केले, तर नगराध्यक्षांनी प्रत्येक विषयाची नोंद व्यवस्थित घेतली जाईल, असे सांगितले.सभेत एकूण ४६ विषयांवर चर्चा झाली. पहिल्या विषयात सन २०२६-२७ साठी विविध विभागांच्या वार्षिक निविदा मागविण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतील कामांवर चर्चा करताना विकास काकडे यांनी त्यांच्या प्रभागात कमी कामे झाल्याची तक्रार मांडली. त्यावर नगराध्यक्षांनी मागणी न केल्यामुळे प्रभाग मागे राहिल्याचे स्पष्ट केले. उपसूचना मतदानात नाकारण्यात आली.महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील कामांवर चर्चा झाली. काही नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी थेट उत्तर द्यावे, अशी मागणी केली. “नमो उद्यान” उभारणीच्या विषयावर चर्चा करताना सौ. स्मिता शहा यांनी वन विभागाच्या जागेचा विचार करावा, अशी सूचना केली. नगराध्यक्षांनी त्या प्रक्रियेस वेळ लागेल, असे सांगितले.पेठ मंगळवार येथील बुद्ध विहार दुरुस्तीचा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. शहर विकास आराखड्याच्या विषयावर पंकज पवार यांनी झोपडपट्टी भागालाही निधी द्यावा, अशी सूचना केली. पप्पू शेख यांनी विरोधी सदस्यांचे मत ऐकले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. यावर नगराध्यक्षांनी सर्व रस्ते सहा महिन्यांत सुधारण्याचे आश्वासन दिले.
नगरपरिषदेच्या विविध कामांना मुदतवाढ देताना निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यास नगराध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.सभेतील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे नगरपरिषद इमारती व सभागृहांना महापुरुषांची नावे देण्याचा प्रस्ताव ठरला. या विषयावर सत्ताधारी व विरोधी गटात तीव्र चर्चा झाली. विरोधी सदस्यांनी पूर्वीची नावे बदलू नयेत, अशी भूमिका घेतली. तर सत्ताधारी सदस्यांनी महापुरुषांच्या नावांचा सन्मान करण्याची भूमिका मांडली. नगराध्यक्षांनी हा विषय सर्वसामान्यांच्या भावनांशी निगडित असल्याचे सांगत महापुरुषांचे योगदान अधोरेखित केले. अखेर हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला.नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसाठी नवीन वाहन खरेदीच्या प्रस्तावावरही चर्चा झाली. काही सदस्यांनी केवळ नगराध्यक्षांसाठी वाहन घ्यावे, अशी सूचना केली. मतदानानंतर हा विषय मंजूर झाला.शहर हद्दवाढीच्या प्रस्तावावर जाधववाडी परिसर प्राधान्याने समाविष्ट करावा, अशी मागणी करण्यात आली. फरांदवाडी येथील जागेवर स्टेडियम उभारणीचा विषयही चर्चिला गेला. विविध विकास कामांसाठी जमीन खरेदी, मनुष्यबळ उपलब्धता, कार्यालयीन सुधारणा, दिव्यांगांसाठी निधी वितरण अशा विषयांवरही चर्चा झाली.वीज विभागासोबत कराराचा विषय स्थगित ठेवण्यात आला. नवीन विद्युत पोल उभारणी, दुहेरी लेखा पद्धतीचा अवलंब, अण्णाभाऊ साठे योजनेतील नवीन कामे, मालमत्ता करावरील अभय योजना यासंदर्भात निर्णय घेण्यात आले.कु. सिद्धाली शहा यांच्या तक्रारीवरून पाणीपुरवठा कामातील त्रुटींवर चर्चा झाली. यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले.एनओसी संदर्भातील विषयावर नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी कायदेशीर मुद्दे उपस्थित केले. नगराध्यक्षांनी सभागृहाला माहिती देण्यासाठी हा विषय घेतल्याचे स्पष्ट केले. या विषयावरही सविस्तर चर्चा झाली.शहरात नवीन शौचालये बांधणे, भुयारी गटार योजनेसाठी जागा खरेदी, विविध योजना राबविणे, एलएएन प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा रक्षक नेमणूक, वाहन खरेदी, बाजार व्यवस्थापन, वकील व आर्किटेक्ट नेमणूक, थकीत गाळ्यांचे जप्ती व फेरलिलाव, स्विमिंग पूल भाडेतत्त्वावर देणे अशा अनेक विषयांवर निर्णय घेण्यात आले.सभेच्या शेवटी पप्पू शेख यांनी ध्वनीप्रणालीबाबत तक्रार केली. त्यावर पुढील बैठकीत सुधारणा करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले.एकूणच, या सभेत शहर विकास, प्रशासनिक सुधारणा आणि महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांवर सविस्तर चर्चा होऊन अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. फलटण शहराच्या विकासाच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरली आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.