कोरेगावमध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार; आमदार महेश शिंदेंची ग्वाही.
कोरेगाव | प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेश शिंदे साहेब यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा कोरेगाव शहरात उभारण्यात यावा, या मागणीचे निवेदन आज खटाव येथील आमदार निवासस्थानी देण्यात आले. या निवेदनाच्या अनुषंगाने आमदार शिंदे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा उभारणीसाठी शंभर टक्के प्रयत्न केले जातील, अशी ठाम ग्वाही दिली.निवेदन देण्यासाठी सुरेश बोतालजी, गोरख बोतालजी उपस्थित होते. यावेळी आमदार महेश शिंदे साहेब म्हणाले, “आजअखेर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने कोणताही अधिकृत प्रस्ताव माझ्याकडे आलेला नव्हता. त्यामुळे हा विषय आता माझ्यासाठी प्रथमच प्रत्यक्ष कामाच्या पातळीवर आला आहे. मात्र, यापुढे अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न १०० टक्के केले जातील.”ते पुढे म्हणाले की, कोरेगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येईल. यासाठी योग्य त्या जागेची स्वतः पाहणी केली जाईल आणि सर्व संबंधित शासकीय प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर पुतळा उभारण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासनही त्यांनी दिले.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे शोषित, वंचित व कष्टकरी समाजाचा बुलंद आवाज होते. त्यांच्या विचारांचा व सामाजिक योगदानाचा सन्मान म्हणून कोरेगाव शहरात त्यांचा पुतळा उभारावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून समाजबांधवांकडून होत होती. नगरपंचायतीने यासंदर्भात ठराव मंजूर केल्यानंतर आता आमदार पातळीवरून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने समाजात समाधान व्यक्त केले जात आहे.आमदार महेश शिंदे यांच्या या आश्वासनामुळे अण्णाभाऊ साठे प्रेमी, मातंग समाज तसेच सर्व समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच कोरेगाव शहरात अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभे राहील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment