स्थानिक स्वराज्य संस्था प्रभाग रचना जाहीर;आता आरक्षण सोडतीची प्रतिक्षा.
स्थानिक स्वराज्य संस्था प्रभाग रचना जाहीर;आता आरक्षण सोडतीची प्रतिक्षा.
सातारा जिल्हा राजकीय वार्तापत्र
श्री अनिलकुमार कदम (मुक्त पत्रकार)
महाराष्ट्र राज्यातील मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील अंतिम प्रभाग रचना नुकत्याच जाहीर झालेल्या आहेत.तथापी आरक्षण सोडत कधी जाहीर होणार याची उत्सुकता व प्रतिक्षा राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी यांना लागली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाव रचना यामध्ये अनेक ठिकाणी पुर्वीच्या प्रभाग रचना व आताची प्रभाग रचना यात बदल झाल्याने प्रस्तावित व विस्थापित राजकीय क्षेत्रातील स्थानिक पातळीवरील नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या राजकीय समीकरणाची फेर जुळवणी व गोळाबेरीज करावी लागेल असे सार्वत्रिक चित्र जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत दिसून येते आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना पक्ष फाटा फुटीनंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील संदर्भ यात मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने नविन राजकीय समीकरणे उदयाला येतील अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. सातारा जिल्ह्याला शंभुराजे देसाई,श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील यांना कॅबिनेट मंत्री पदे देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा जिल्ह्यातील आपापल्या पक्ष संघटना मजबूती साठी राजकीय मुत्सद्दीपणा व राजकीय ताकद पणाला लावली आहे.या चारही कॅबिनेट मंत्री म्हणून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये कॅबिनेट मंत्री पदाची खरी राजकीय अग्निपरीक्षा होणार आहे.प्रभाग रचना व आरक्षण याचा मेळ बसवून जिल्ह्यातील सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सत्तेची सूत्रे आपल्या हातात घेचून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील सुप्त संघर्ष व पडद्यामागील घडामोडी आगामी निवडणुकीत वेगाने बदलत राहतील अशी राजकीय जाणकार निरीक्षकांची मते आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय क्षेत्रातील डावपेच सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अतुल भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आगामी काळात सत्तेच्या चाव्या भाजपच्या हाती घेण्यासाठी व्युहरचना करताना दिसतील.तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय क्षेत्रातील डावपेच सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर ,मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील,माजी मंत्री विलासराव पाटील यांचे चिरंजीव उदयसिंह पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात सत्तेच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात घेण्यासाठी व्युहरचना आखताना दिसून येते आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा पालकमंत्री पदी शंभुराजे देसाई यांची वर्णी लावून आघाडी घेतली आहे.पालकमंत्री शंभुराजे देसाई व आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (एकनाथ शिंदे गट) सत्तेच्या चाव्या खेचून घेण्यासाठी राजकीय व्युहरचना आखताना दिसून येते आहेत.
सातारा जिल्ह्यातील भारतीय काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रणजित देशमुख, सातारा जिल्हा काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष डॉ सुरेश जाधव,बाबासाहेब कदम, राजेंद्र शेलार, अजितराव पाटील - चिखलीकर,नरेश देसाई यांच्या सहकार्याने राजकीय डावपेच आखले जात आहेत.समविचारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) पक्ष संघटना यांच्या समवेत चर्चा वाटाघाटी सुरू आहेत. महायुतीने स्वबळावर स्वतंत्रपणे निवडणूका लढवल्या तर अखिल भारतीय काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांना राजकीय क्षितिजावर संधी मिळू शकते.
सध्या गौरी गणपती,महाळाचा पंधरावडा, नवरात्र उत्सव,दसरा दिवाळी या सणासुदीला नेते पदाधिकारी कार्यकर्ते आपापल्या मतदारसंघात जनतेच्या संपर्कात राहण्यासाठी विविध प्रकारच्या माध्यमातून कामाला लागले आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होत नाही तोपर्यंत सातारा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार नाही. सध्या सर्वच राजकीय पक्षांनी सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघ निहाय नव्याने तयार झालेल्या प्रभाग रचना याचा अभ्यास करुन भावी उमेदवार शोधण्यासाठी चर्चा विनिमय सुरु आहे.तथापी सगळे राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी हे पक्षाच्या नेत्यांना आरक्षण सोडतीचा निर्णय झाल्यानंतर भुमिका स्पष्टपणे मांडू अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या प्रगाभ रचना जाहीर झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय नेते मंडळींनी आपल्या पक्षाच्या संघटनात्मक बांधणी व पक्ष बळकटीसाठी मेळावे आयोजित करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्यांत जोरदारपणे राजकीय रस्सीखेच स्पर्धा वाढू शकते.याचा राजकीय फायदा घेण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे नेते मंडळींनी एकत्र येऊन विचारविनिमय करून राजकीय मोर्चेबांधणी केली तर आमदार पृथ्वीराज चव्हाण व आमदार शशिकांत शिंदे यांना भविष्यात चांगले दिवस येतील अशी राजकीय शक्यता आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या प्रगाभ रचना जाहीर झाल्यानंतर आता आरक्षण सोडतीची प्रतिक्षा सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांना लागून राहिली आहे.राजकीय पक्षाचे नेते कामाला लागले आहेत पण आरक्षण सोडतीचा निर्णय झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी वेगाने कामाला लागतील अशी सध्याची परिस्थिती आहे.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या आरक्षण सोडती नंतर राजकीय घडामोडींना वेग येणार व अनेक ठिकाणी राजकीय भूकंप व धक्कादायक घटना घडतील असा राजकीय क्षेत्रातील अभ्यासक जाणकार यांचा अंदाज आहे.
Comments
Post a Comment