पुसेगावमधील ११११ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत; गौरव जाधव मित्र समूहाकडून शैक्षणिक साहित्याचे वितरण.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
पुसेगाव, ता. १४ : येथील गौरवभैय्या जाधव मित्र समूहाच्या वतीने पुसेगावमधील ११११ गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या साहित्यामध्ये दप्तर, वह्या, कंपासपेटी, पेन, पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. हा कार्यक्रम येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणात पार पडला. श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.आपली आजची येणारी पिढी ही खर्या अर्थाने भारताच भविष्य आहे. आज अर्थकारणामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांना आपल शिक्षण अर्ध्यातच थांबवावं लागत असल्याचं चित्र आहे. अशाच काही गंभीर समस्यांवर लक्ष देत गेल्या तीन वर्षांपासून शैक्षणिक साहित्य वाटपाच्या माध्यमातून गौरव जाधव मित्र समूह भारताच्या उज्वल भविष्यासाठी एक छोटासा प्रयत्न करत आहे.विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके मोफत मिळतात, परंतु त्या व्यतिरिक्त लागणारे इतर शैक्षणिक साहित्य उदा. वही ,पेन, पेन्सिल, कंपास, दप्तर आदी साहित्य काही विद्यार्थ्यांना त्यांचे पालक देऊ शकत नाहीत. तीन वर्षांपूर्वी ही बाब कायम सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विश्वस्त गौरव जाधव यांच्या लक्षात आली. तेव्हापासून त्यांनी तीन हजारांहून अधिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ विद्यार्थ्यांना ‘शाळासोबती’ या उपक्रमाअंतर्गत स्वखर्चातून मोफत उत्तम दर्जाच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. विशेष म्हणजे गरजवंताला मदत करताना दिलेल्या वस्तूंवर आपला पक्ष अथवा स्वतःचे नाव न छापता ते मदत करत आहेत.यंदा देखील हीच परंपरा कायम ठेवत समाजसेवेच्या माध्यमातून शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘शाळासोबती’ या उपक्रमाअंतर्गत पुसेगावमधील पालकांना एक कॉल करून आपल्या पाल्याला आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक साहित्याची नोंद करण्याचे आवाहन केले गेले. त्यानंतर नोंदणीनुसार उपक्रमात सहभागी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील १ हजार १११ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले गेले.याप्रसंगी ट्रस्टचे आजी-माजी पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, गौरवभैय्या जाधव मित्र समूहाच्या माध्यमातून शाळासोबती सारखे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. या स्तुत्य उपक्रमामुळे शिक्षणाची गंगोत्री तळागाळात पोहोचवण्यास मदत होत आहे. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून गौरव जाधव मित्र समूहाने दाखवलेल्या या सामाजिक जाणीवेबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू हीच आमच्या कामाची पावती आहे. डोळ्यात अभ्यासाचे स्वप्न घेवून हे विद्यार्थी उद्या मोठ्या पदावर जातील. तेही पुढे गरजूंना अशीच मदत करतील, हेच संस्कार आपण रुजवतोय.
- गौरव जाधव - विश्वस्त, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव.
Comments
Post a Comment