महाराष्ट्राच्या कबड्डी खेळाडुंनी देशाचे नाव उंचावल्याचा अभिमान:-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नरेंद्र नगर, नागपूर येथे अखिल भारतीय आमंत्रित कबड्डी स्पर्धा, नागपूर महानगरपालिका व लक्ष्यवेध बहुउद्देशीय संस्थेद्वारे आयोजित 'मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा 2025'चे मशाल प्रज्वलनाने उदघाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या हुला हूपबद्दल आणि अमित योगा ग्रुपने सादर केलेल्या यौगिक रामायणाबद्दल त्यांचे कौतुक केले. वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या खेळाडुंसाठी ही स्पर्धा सार्थक सिद्ध होईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भारतीय खेळाडुंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वच स्पर्धा जिंकल्या आहेत. भारतीय कबड्डी संघात महाराष्ट्र आणि हरियाणाचे सर्वाधिक खेळाडू पाहायला मिळतात. या स्पर्धांद्वारे महाराष्ट्राच्या खेळाडुंनी देशाचे नाव उंचावले, याचा अभिमान आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कबड्डीला व्यावसायिक रुप देण्यासाठी प्रो कबड्डीसारखी स्पर्धा सुरु झाली. नागपूर महानगरपालिका वेगवेगळ्या खेळांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडुंना मदत करत आहे, याबद्दल महानगरपालिकेला धन्यवाद. आमचे मार्गदर्शक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते, यासाठी अनेक मैदानांची निर्मिती केली जाते, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.गेल्या तीन वर्षांत राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांत महाराष्ट्राला सर्वांधिक पदके मिळाल्याबद्दल राज्यातील खेळाडुंची प्रशंसा करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्य शासनाने पुण्यामध्ये क्रीडा विद्यापीठ सुरु केले आहे. नागपूरमधील मानकापूर येथेही क्रीडा विद्यापीठ सुरु करण्याची इच्छा आहे. खेळामध्ये व्यावसायिकता आणण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच खेळाडुंना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सोबतच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकविजेत्या खेळाडुंना देण्यात येणारी प्रोत्साहनपर रक्कम ₹10 लाखांवरुन ₹1 कोटी इतकी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.यावेळी आ. प्रविण दटके, अभिनेते स्वप्निल जोशी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment