तासवडे टोल नाक्यावर ९ किलो सोने व ६० किलो चांदी जप्त.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत कुरीयर कंपनीच्या गाडीची तपासणी करताना पोलिसांना ७ कोटी ५३ लाखांचे सोने व चांदी आढळून आली आहे. सोने चांदी चलनाप्रमाणे आहे की नाही याची खात्री करण्यासाठी, पकडण्यात आलेली कुरीयर कंपनीची गाडी तळबीड पोलीस ठाण्यात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आली असून विविध तपासणी पथकांचे सहकार्य घेण्यात येत आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाका हद्दीत दि. २७ रोजीच्या सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास कराड ते सातारा जाणाऱ्या रस्त्यावरील तासवडे टोल नाक्यावर एम.एच. १२ व्ही.एफ ३९३७ या क्रमांकाची कुरिअर वाहतूक करणारी गाडी अडवण्यात आली. वाहनाच्या चलनाची तपासणी केल्यानंतर गाडीत सोन्या-चांदीचे दागिने असल्याचे आढळले. या वस्तू चलनाप्रमाणे आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी, सदरची गाडी तळबीड पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आली, ज्यामध्ये विविध तपासणी पथकांचे सहकार्य घेण्यात येत आहे.ही कारवाई एफएसटी पथक, जीएसटीचे अधिकारी, आयकर विभागाचे अधिकारी, कराड तहसीलदार आणि कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आली. तपासणीमध्ये ९ किलो ३९० ग्रॅम सोने आणि ६० किलो चांदी असल्याचे निष्पन्न झाले, ज्याची अंदाजे किंमत ७ कोटी ५३ लाख रुपये आहे.
सध्या आयकर विभागाकडून इनवाइसची पडताळणी सुरू आहे. तोपर्यंत सोन्या-चांदीचे दागिने पोलीस संरक्षणाखाली सुरक्षितपणे वाहनात ठेवलेले आहेत. कराड उत्तर एफएसटी पथकाने या वाहनाची तळबीड पोलीस ठाण्यातून कराड कोषागारात सुरक्षितपणे नेण्याची जबाबदारी घेतली आहे, आणि योग्य त्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आली असल्याचे
पोलिसांनी सांगितले.
Comments
Post a Comment