विसापूर शाळेत भरला बालबाजार चिमुकल्यांच्या बाजारात हजारांची उलाढाल.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे मिळावेत यासाठी विसापूर, ता.खटाव येथील जि प शाळेत चिमुकल्यांचा बालबाजार भरवण्यात आला. कृतीयुक्त शिक्षण हा शिक्षणाचा गाभा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते. गणिती ज्ञानाचा व्यवहारात उपयोग व्हावा या हेतूने बालबाजार भरविण्यात आल्याचे मुख्याध्यापक श्री.ज्ञानेश्वर धायगुडे यांनी नमूद केले.
सकाळपासूनच शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांनी आपले वैविध्यपूर्ण स्टॉल मांडले होते. भाजीपाला, फळभाज्या, फळे, गरम बटाटा भजी, सँडविच, वडापाव आदी वेगवेगळ्या पदार्थांची रेलचेल होती. 'भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी, आला बघा,गावरान मेवा' असे म्हणत आपला माल विकण्यासाठी विद्यार्थी वेगवेगळा फंडा वापरत होते. ग्रामस्थ व पालकांनी बाजारासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देत खरेदीचा आनंद घेतला. काहींनी विद्यार्थ्यांचे सामान्यज्ञान तपासत अनेक प्रश्नही विचारले. हिशेब विचारत बाजाराचा उद्देश सफल करण्यात हातभार लावला. या बाजारात तब्बल वीस हजारांच्या वर उलाढाल झाली.वैशाली नांदे, स्मिता जामदार, शुभांगी चव्हाण, वैशाली जाधव, रेश्मा बोडरे यांनी बाजाराचे नियोजन केले. बाजाराचे उदघाटन प्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, जेष्ठ नागरिक, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment