धावपळीच्या युगामध्ये पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. संजय चिवटे; कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात पत्रकारांची आरोग्य तपासणी.
धावपळीच्या युगामध्ये पत्रकारांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी : डॉ. संजय चिवटे; कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात पत्रकारांची आरोग्य तपासणी.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगाव : स्पर्धात्मक युगामध्ये माणसाचे जगणे अधिक अस्थिर आणि धावपळीचे होऊन गेले आहे. पत्रकार हा घटक समाजाच्या सेवेसाठी २४ तास कार्यतत्पर असतो. अशा स्थितीत उत्तम आरोग्यासाठी “प्रिव्हेन्शन” हा एकच कानमंत्र आहे, असे मत यांनी कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय चिवटे यांनी व्यक्त केले.मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त सातारा जिल्हा पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषद आणि क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय व कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार आरोग्य तपासणी दिन साजरा करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयात डॉ. संजय चिवटे यांच्यासह कोरेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हणमंतराव बर्गे, डॉ. हनुमंत ठोंबरे, डॉ. निलेश दबडे, डॉ. ओंकार सोनवणे यांच्यासह मान्यवर पत्रकारांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. चिवटे बोलत होते.
डॉ. चिवटे म्हणाले की, पत्रकार आपल्या आरोग्याच्या बाबत दुर्लक्ष करताना दिसतात. आरोग्य विषयक सल्ला घेणे टाळतात. एखाद्या रोगाचे निदान किती महत्त्वाचे होते हे जवळचा व्यक्ती गमावल्याशिवाय कळत नाही मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. हा उशीर टाळण्यासाठीच वर्षातून दोनदा सर्व प्रकारच्या तपासण्या करणे गरजेचे आहे. कॅन्सर, हृदयविकार यांसारख्या आजारांमध्ये खूप उशिरा आजार कळल्यानंतर त्यातील गुंतागुंत वाढत जाते. मात्र आपली मानसिकता ही कोणताही आजार अंगावर काढण्याची असल्याने अनेकदा रुग्ण यामध्ये आजार बळावून बसतात. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्याकडे लक्ष द्यावे व आरोग्य विषयक राज्य शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. चिवटे यांनी केले.हणमंतराव बर्गे म्हणाले की, पत्रकारांना दैनंदिन जीवनात अनेक ताण तणावांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीत स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापनदिन हा पत्रकार आरोग्य तपासणी दिन साजरा करण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व किरण नाईक यांनी घेतला आहे. यानिमित्ताने राज्यभरात पत्रकारांची आरोग्य तपासणी केली जात आहे. कोरेगाव तालुक्यातील पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून, तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक जण आता आपल्या आरोग्याची निश्चितपणे काळजी घेणार आहे, असेही त्यांनी सांगितले.संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शरद काटकर, महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधीस्वीकृती समितीचे अध्यक्ष व सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, पुणे विभागीय अधीस्वीकृती समिती चे सदस्य चंद्रसेन जाधव ,जिल्हा सरचिटणीस दीपक प्रभावळकर, प्रसिध्दी प्रमुख दीपक शिंदे ,परिषद प्रतिनिधी सुजीत आंबेकर, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक राहूल तपासे, समन्वयक शंकर मोहिते, डिजिटल मिडियाचे राज्य उपाध्यक्ष सनी शिंदे,राज्य महिला संघटक विद्या नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुक्यात हे शिबिर यशस्वी झाले आहे नजीकच्या काळात पत्रकारांच्या आरोग्याच्या काळजी बरोबरच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याची ग्वाही हणमंतराव बर्गे यांनी दिली.या शिबिरामध्ये पत्रकारांची ईसीजी तपासणी, रक्त, लघवी आणि शुगर तपासणी. किडनी आणि लिव्हर तपासणी, छातीचा एक्सरे, उच्च रक्तदाब आणि कमी रक्तदाब आदी तपासण्या करण्यात आल्या.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी, मुख्य परिचारिका जोशी, राऊत, गणेश विभुते, चव्हाण, संभाजी पवार, प्रियंका कांबळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ शेलार, मोरे, एक्स रे तंत्रज्ञ पांढरपट्टे, औषधे निर्माण अधिकारी लावंड यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment