प्रधानमंत्री आवास योजना गृहसंकुल भूमिपूजन सातारारोड मध्ये उत्साहात.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
सातारा, दिनांक ७: विविध आवास योजनांच्या अंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना उपलब्धतेनुसार शासकीय जमीन घरकुलासाठी उपलब्ध करून दिली जाते.त्याअंतर्गत 12 लाभार्थ्यांना सातारा रोड येथे एकच ठिकाणी बारा घरकुले मंजूर करून प्रत्येकी 500 स्क्वेअर फुट जागा उपलब्ध करून देण्यात आली. या संकुलाचे भूमिपूजन उत्साहात झाले.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, कोरेगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी किशोर माने, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी सुनील चिकणे, घरकुल तालुका समन्वयक अक्षय चांदेकर, सरपंच किशोर फाळके त्याचप्रमाणे लाभार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सातारा रोड येथील बारा भूमी लाभार्थ्यांना घरकुलासाठी एकत्रित जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि त्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. या सर्व लाभार्थ्यांची बांधकाम शासनामार्फत करण्यात येणार आहे लाभार्थींपैकी एका कुटुंबाच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री खिल्लारे यांनी शासकीय योजना समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचाव्यात यासाठी अधिकारी कर्मचारी यांनी सर्व ते प्रयत्न करावेत.तसेच नागरिकांनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये संपर्क साधावा असे आवाहन केले. समाजातील सर्व स्तरातील घटकांसाठी राज्य आणि केंद्र पातळीवरच्या विविध प्रकारच्या शासकीय योजना उपलब्ध आहेत. त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. घरकुल योजना मंजूर झाली आहेत, त्यांनी वेळेमध्ये घरकुले पूर्ण करावीत आणि प्रशासनास सहकार्य करावे,असे प्रतिपादन प्रकल्प संचालक श्री.हराळे यांनी केले. घरकुले दर्जेदार पद्धतीने व्हावीत याची पूर्णतः काळजी घेतली जाईल. नागरिकांनी विविध योजनांच्या माहितीसाठी पंचायत समिती तसेच ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन गटविकास अधिकारी किशोर माने यांनी केले. यावेळी सर्व लाभार्थ्यांनी घरकुल आणि जागा प्राप्त झाल्याबद्दल शासनाचे आभार मानले.
Comments
Post a Comment