बोबडेवाडीचा बिनविरोध निवडणूक परंपरेचा आदर्श प्रेरणादायी: क्षीरसागर.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगाव, दिनांक 8: तालुक्यातील बोबडेवाडी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सरपंच आणि सात सदस्यांसाठी पार पडली. ही निवडणूक पूर्णतः बिनविरोध झाली. 1998 पासून या ग्रामपंचायतीची बिनविरोधची परंपरा आहे .ही परंपरा इतरांना आदर्श घेण्यासारखी आहे ,असे प्रतिपादन पंचायत समितीचे सांख्यिकी विस्ताराधिकारी तथा बोबडेवाडीचे निवडणूक निर्णय अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच आणि सर्व सदस्यांना श्री.क्षीरसागर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक राज्य निवडणूक आयोगाची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली .त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नूतन सरपंच अरुणा संदीप बोबडे आणि सर्व नूतन सदस्य उपस्थित होते. श्री. क्षीरसागर म्हणाले," मतभेद आणि हेवेदावे या पलीकडे जाऊन विकासाचा विचार ग्राम पातळीवर रुजवणे गरजेचे आहे. हा विकासाचा विचार रुजवण्यासाठी गावात ऐक्य असणे गरजेचे आहे. नव्या युगातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावाचा सर्वांगीण विकास करणे राज्यघटनेत अपेक्षित आहे. त्यादृष्टीने विचार करता बिनविरोध निवडणूक हा एक महत्त्वाचा आदर्श घेण्यासारखा आहे .बोबडेवाडी मध्ये गेली 25 वर्षे सदस्य आणि सरपंचांची निवड बिनविरोध होत आहे. हा अनोखा रौप्यमहोत्सव प्रेरणादायी आणि स्फूर्तीदायी आहे .सर्व सदस्य व सरपंचांनी असाच एकोपा कायम राखत गावाची सेवा करावी"नूतन सदस्य अनिल पवार यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment