भुरकवडीत नवरात्र उत्सव उत्साहात साजरा.
पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.
भुरकवडी ता. खटाव येथील जागृत असलेल्या ग्रामदेवता हजारों भाविकांचे श्रध्दास्थान असलेली श्री.निनाई देवी व श्री.तुळजा भवानी देवीच्या नवरात्रोत्सवात आईसाहेबांच्या नावानं चांगभलं .... आई राधा उदे उदे.... च्या जयघोषात आणि पांरपारिक वाद्यांच्या गजरात सलग नऊ दिवस तुळजापूरचे आराधी अक्षय माने व विकास माने यांच्या विधीवत पूजाअर्चाने मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या काळात देवीचा जागर म्हणून ग्रामस्थ व पुजारी मंडळी यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये भूईज येथील हभप मिराताई दिक्षित यांचे किर्तन, लखन पोतराज कोरेगाव, दरूज, निढळ, खोडजाईवाडी, अंभेरी भजनी मंडळाची भजन सेवा व देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. तर भुरकवडीतील तरूण युवतींनी गरबा दडिंया कार्यक्रम तर महिला मंडळाने सलग नऊ दिवस देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम पार पाडला. नवरोत्सवात दोन्ही मंदिरातील विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अष्टमीला दोन्ही देवींच्या पालख्या सजवून हारजाळी चढवून विधीवत धार्मिक कार्यक्रम करत वाद्यांच्या गजरात, फटाक्याच्या अतिषबाजीत मंदिराभोवती व गावातून सिद्धनाथ पावक्ता मंदिरापर्यत मिरवणूक काढत सोने लुटण्याचा कार्यक्रम विजयादशमी दसऱ्याला पार पडला. सलग ३६ वर्षाची परंपरा कायम जोपासत गावातील तरुणांनी तुळजापूर ते भुरकवडी शांतीज्योत आणली. शांतीज्योतीचे स्वागत सरपंच ललिता कदम, महिला ग्रामस्थांनी केले. यावेळी तुळजापूर देवस्थान प्रमाणे भुरकवडी येथेही दैत्याला बळी देण्याचा कार्यक्रम पार पाडून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. हा उत्सव पार पाडण्यासाठी सरपंच, देवस्थान पुजारी मंडळी, तरूण वर्ग व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment