पावसाळी अधिवेशन ठरले कोरेगावकरांसाठी पर्वणी; आणखी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर, आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश, तीळ गंगा नदी परिसराचा होणार कायापालट.

पावसाळी अधिवेशन ठरले कोरेगावकरांसाठी पर्वणी; आणखी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर, आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना यश, तीळ गंगा नदी परिसराचा होणार कायापालट.

कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. 

संपूर्ण कोरेगाव शहर व परिसराचा कायापालट करण्याचा ठाम निर्धार केलेल्या आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नांना चांगलेच यश येत आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन या शहरासाठी पर्वणीच ठरले आहे.
राज्य सरकारने नगरपंचायतीच्या दहा कोटी रुपयांच्या निधीला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री द्वय ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजितदादा पवार यांनी या निधीस मान्यता दिली आहे. तीळगंगा नदी सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत साखळी पूल ते बाजारपेठ पूल या दरम्यान कामे या निधीतून केली जाणार आहेत. त्याचबरोबर सुभाषनगर परिसरातील प्रमुख चौकात सांस्कृतिक भवन देखील उभारले जाणार आहे.आमदार महेश शिंदे यांनी संपूर्ण शहराचा रोड मॅप बनवला असून नजिकच्या काळात हे शहर पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य स्वच्छ व सुंदर शहर बनवण्याचा त्यांचा मानस आहे. प्रत्येक विकासकाम हे ठोस व दर्जेदार होण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. कोरेगाव शहराच्या मधोमध वाहणाऱ्या तीळगंगा नदी परिसराचे सुशोभीकरण करण्याची नागरिकांची अनेक दिवसांची मागणी आता मान्य झाली असून प्रत्यक्षात कामाला सुरुवात देखील करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात महादेवनगर दहावा कट्टा ते साखळीपूर यादरम्यान पाच कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यात साखळी पूल ते बाजारपेठ पूल या दरम्यान नदी परिसराचे सुशोभीकरण केले जाणार असून संरक्षक भिंत बांधणे व बागकाम करणे यासाठी तब्बल साडेनऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नदीच्या पूर्व बाजूस ही भिंत बांधली जाणार असून जुना मोटार स्टॅन्ड, हनुमान घाट, बाजारपेठ, जुनी पेठ ते केदारेश्वर मंदिर असा सरळ रस्ता देखील तयार होणार आहे. या परिसरातील दुर्गंधी संपुष्टात येणार असून आठवडा बाजारासाठी कमी पडत असलेले बाजारतळ मैदान आता नवीन बाजारकरुंसाठी जागा उपलब्ध होणार आहे. या नवीन रस्त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी संपुष्टात येणार असून कठापूर परिसरातील नागरिक थेट सातारा लातूर महामार्गावर पोहोचू शकणार आहेत. सुभाषनगर चौकामध्ये सुभाषनगर नवरात्रौत्सव मंडळाला भव्य सभामंडप बांधून दिला जाणार आहे, तसेच परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात आमदार महेश शिंदे यांनी यासंदर्भातील प्रस्ताव नगरविकास खात्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यासाठी विशेष सहकार्य केले. उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ना. अजितदादा पवार यांनी यांनी आदेश काढत त्यास तातडीने मान्यता दिली असून कोरेगाव शहराच्या विकासामध्ये आता मोठी भर पडणार आहे.
आमदार महेश शिंदे यांनी विकासकामांबाबत धडाका लावला असून सर्वात मोठे काम तिळगंगा नदी सुशोभीकरण व स्वच्छतेचे हाती घेतले आहे. संपूर्ण शहरवासीयांचे आरोग्य अवलंबून असलेल्या या नदीचा आता कायापालट होत असून जोड रस्ते, मॉर्निंग वॉक ट्रॅक, बागबगीचा यामुळे हा परिसर सुशोभित होणार आहे. एकूणच आमदार महेश शिंदे यांच्या भूमिकेचे नागरिकांनी स्वागत केले असून त्यांना धन्यवाद दिले आहेत. सुभाषनगरचा होतोय कायापालट
सुभाषनगर येथे मॅफको कंपनी समोर असलेल्या नगरपंचायतीच्या मोकळ्या जागेत सुभाष नगर नवरात्र उत्सव मंडळासाठी सभामंडप बांधून परिसराचे सुशोभीकरण करण्याबाबत नागरिकांच्यावतीने उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांनी आपल्या वाढदिवसादिवशी आमदार महेश शिंदे यांच्याकडे मागणी केली होती. अवघ्या चारच दिवसात या कामाला मान्यता मिळाली असून त्यासाठी ५० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. सुभाषनगर परिसर आता हायटेक बनत असून सात मजली इमारतींमुळे या परिसराला शहराचे स्वरूप आले आहे. नवीन प्रशासकीय इमारत, सांस्कृतिक भवन, जिम्नॅशियम, कुस्ती संकुल यासह शाळा - महाविद्यालय परिसर असल्याने वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सुभाषनगर येथे सांस्कृतिक भवन बांधण्याचा मनोदय आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला होता. ५० लाख रुपयांच्या निधीमुळे सुभाषनगर चौकाचे सुशोभीकरण होणार असून या परिसराला आता विशेष महत्त्व येणार आहे. एकूणच उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे यांनी घेतलेल्या परिश्रमाला आता यश आले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.