कोरेगाव शहरातून चांगले प्रशासकीय अधिकारी व शास्त्रज्ञ तयार व्हावेत यासाठी प्रयत्नशील : प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, कोरेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप.
कोरेगाव शहरातून चांगले प्रशासकीय अधिकारी व शास्त्रज्ञ तयार व्हावेत यासाठी प्रयत्नशील : प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, कोरेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
कोरेगाव शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. शहराला शैक्षणिक व सांस्कृतिक वारसा आहे. या शहरातून अधिकाधिक चांगले विद्यार्थी घडावेत, त्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी व शास्त्रज्ञ तयार व्हावेत. जे भविष्यकाळात माय भूमीची सेवा करतील, या विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही कोरेगावचे प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी दिली.वात्सल्य सिंधू मातोश्री स्व. सिंधुताई फत्तेसिंह बर्गे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ज्या शाळेत आपण बाराखडी गिरवली त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी राजाभाऊ बर्गे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. मंगळवारी झालेल्या शानदार कार्यक्रमात प्रसिद्ध दरबार उद्योग समुहाच्यावतीने मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राजाभाऊ बर्गे बोलत होते. कोरेगावचे ज्येष्ठ व्यापारी जयंतीशेठ बहुआ, कोरेगाव व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत मर्दा, इतिहास संशोधक पांडुरंग सुतार, कोरेगाव वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. सुहास भंडारे, सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे, कापड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश दायमा, किराणा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी मिथुन भंडारी, उद्योजक योगेश बर्गे आदींची प्रमुख उपस्थिती होती.राजाभाऊ बर्गे पुढे म्हणाले, कोरेगाव शहराला किंबहुना जिल्ह्यात नावलौकिक मिळवलेले अनेक विद्यार्थी हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन मधून शिक्षण घेतलेले आहेत. आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेचे ऋण व्यक्त करण्यासाठी आजचा उपक्रम हाती घेतला आहे. एकविसाव्या शतकामध्ये वाटचाल करत असताना विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती व्हावी, बदलत्या शिक्षण पद्धतीमध्ये त्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. शिक्षण विभागाने दर्जेदार मुख्याध्यापक व शिक्षकांची या शाळेत नेमणूक केली आहे. भविष्यकाळात ही शाळा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अव्वल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्राथमिक शाळेमुळे आम्ही घडलो. आयुष्यात खडतर वाटचाल करत प्रगतीची शिखरे पार केली. या शाळेच्या शिक्षणामुळेच किंबहुना या शाळेतून मिळालेल्या संस्कारामुळेच कोरेगाव शहराची सेवा करता आली. शहराच्या प्रथम नगराध्यक्षपदाचा मान देखील मिळाला. या पदावर काम करत असताना सामाजिक भान ठेवले. शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान दिले. कोरेगाव शहराचा देश पातळीवर सर्वोच्च बहुमान झाला, त्याला कारण देखील ही शाळा आहे, असे म्हणले म्हटले तर वावगे ठरणार नाही, असेही राजाभाऊ बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक दोन ही कोरेगाव शहराचे ऊर्जा स्थान आहे, या शाळेची गुणवत्ता वाढण्यासाठी उपक्रम राबवा, त्यासाठी कायम सहकार्य राहील. येत्या वर्षात साजऱ्या होणाऱ्या शाळेच्या अमृत महोत्सवासाठी सर्वांना बरोबर घेऊन कार्यक्रम राबूया, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सुरेश कुलकर्णी, संतोष नलावडे यांनी आपल्या मनोगतामध्ये कोरेगाव शहरातील शैक्षणिक क्रांतीचा आढावा घेतला. महाराष्ट्रात देशात नव्हे तर आशिया खंडात कोरेगावची बाजारपेठ ही महत्त्वपूर्ण बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या बाजार शहराला बाजारपेठेचा दर्जा देण्यास देखील ही शाळा कारणीभूत आहे. या शाळेने असंख्य विद्यार्थी घडविले आहेत. जे आज देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असून कोरेगावचा नावलौकिक वाढवत असल्याचे त्यांनी सांगितले.मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
उपशिक्षक जावेद बागवान यांनी प्रास्ताविकात शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला. उपशिक्षिका उर्मिला शिंदे यांनी आभार मानले.कार्यक्रमास उपशिक्षक उल्का कदम, सुरेखा गोरे, मनीषा जाधव, रुक्साना आतार यांच्यासह विद्यार्थी, पालक, परिसरातील नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment