सातारा पंढरपूर रस्ता दुरवस्था, भीमनगर दरेला जमिन मोबदला प्रश्न प्रलंबित रमेश उबाळे यांचा शासनावर आरोप, दि.१० जुलैपासून आमरण उपोषण.
सातारा पंढरपूर रस्ता दुरवस्था, भीमनगर दरेला जमिन मोबदला प्रश्न प्रलंबित रमेश उबाळे यांचा शासनावर आरोप, दि.१० जुलैपासून आमरण उपोषण.
कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.
पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या कामामध्ये गेलेल्या भीमनगर, दरे (ता. कोरेगाव) या गावांतील जमिनीचा मोबदला संबंधित शेतकऱ्यांना न मिळाल्याबद्दल वेळोवेळी निवेदन देऊन, ठिय्या आंदोलन करूनही न्याय न मिळाल्यामुळे तसेच सातारा-पंढरपूर महामार्गाच्या दुरवस्थेबाबत यापूर्वी दिलेल्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे दहा जुलैपासून सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष रमेश उबाळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.श्री. उबाळे यांनी 'भीमनगर, दरे'प्रश्नी मुख्यमंत्री कार्यालयास तसेच सातारा-पंढरपूर महामार्गाच्या कामाबाबत पंतप्रधान कार्यालयास प्रशासनामार्फत स्वतंत्रपणे निवेदने दिली आहेत. 'भीमनगर, दरे' संदर्भातील निवेदनात म्हटले आहे, की पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या सध्या सुरू असलेल्या कामामध्ये भीमनगर, दरे या गावांतील ३५ खातेदारांच्या शासनाकडून मिळालेल्या पुनर्वसित शेतजमिनी गेल्या आहेत. तसेच भीमनगर येथील स्मशानभूमीची १३ गुंठे व दरे येथील स्मशानभूमीची १७ गुंठे, अशी एकूण ३० गुंठे जमीन रेल्वे लाईनच्या कामामध्ये गेली आहे. त्या बदल्यात जमीन अथवा आर्थिक मोबदला ग्रामस्थांना मिळाला नाही. याप्रश्नी गेल्या दोन फेब्रुवारी रोजी निवेदन दिले होते. तसेच गेल्या २३ फेब्रुवारी रोजी ठिय्या आंदोलन केले होते. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही. याप्रश्नी न्याय न मिळाल्यामुळे भीमनगर, दरे गावांतील ३५ कुटुंबांसोबत येत्या दहा जुलै रोजी सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसणार आहोत. त्यानंतर देखील न्याय न मिळाल्यास भीमनगर, दरे येथील ३५ कुटुंबांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आत्मदहन करणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री, रेल्वे मंत्री व साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत.
सातारा-पंढरपूर महामार्गाच्या कामासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की सातारा-पंढरपूर महामार्गाच्या कामास फक्त दोन वर्षे झाली आहेत आणि आजही हे काम अपूर्ण आहे. काम झालेल्या अनेक ठिकाणी खड्डे व भेगा पडल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. निकृष्ठ दर्जाचे काम असल्याने त्यात शासकीय अधिकारी व कंत्राटदारांच्या संगनमताने आर्थिक देवाणघेवाण झाली असावी, अशी शंका नाकारता येत नाही. क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट्स, कॉंक्रीट मिक्स डिझाईन, कॉंक्रीट थिकनेसमध्ये पूर्णपणे फेरबदल केला असून, खोटी कागदपत्रे सादर केलीआहेत. यासंदर्भात गेल्या दोन फेब्रुवारी रोजी निवेदन दिले होते. त्यातील अनुक्रमे एक ते आठ मुद्द्यांची सखोल चौकशी केल्याचे निदर्शनास येत नाही. या कामावरील कार्यरत पर्यवेक्षकीय शासकीय अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी व संबंधित कॉन्ट्रॅक्टरला काळया यादीमध्ये तत्काळ समाविष्ट करावे व निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे काम संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून पुन्हा नव्याने करून घेण्यात यावे. अन्यथा, येत्या दहा जुलै पासून सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसणार आहे. त्यात माझे काही बरे वाईट झाल्यास संबंधित सर्व अधिकारी जबाबदार राहतील, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाच्या
प्रती पंतप्रधान कार्यालय, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,
नॅशनल हायवे अॅथॉरिटी यांना पाठवल्या आहेत.
Comments
Post a Comment