निश्चित ध्येय यशापर्यंत घेऊन जाते - शिवव्याख्याते विशाल सुर्यवंशी.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
तरुणांनी आयुष्यामध्ये ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे आहे. नुसते ध्येय निश्चित करून उपयोग नाही तर त्याचा पाठपुरावा करत ते मिळवण्यासाठीचे सातत्य तितकेच महत्त्वाचे आहे. आयुष्यात ध्येयप्राप्तीचा आनंद इतर कोणत्याही आनंदापेक्षा कणभर जास्तच असतो. निश्चित ध्येय प्रत्येक मनुष्याला यशापर्यंत घेऊन जात असते असे मत शिवव्याख्याते विशाल सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.
लक्ष्य करिअर अकॅडमी, ललगुण येते भरती पूर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी संस्थापक शंकरराव खापे, विजय पाटणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी शिवव्याख्याते विशाल सुर्यवंशी म्हणाले भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रामुळे अनेक विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस मध्ये भरती होण्यासाठी निश्चितपणे मदत होत आहे. एकाच ध्येयाने एकत्र आलेल्यांची ध्येयप्राप्ती लवकर होते. जिद्द , चिकाटी आणि सरावातील सातत्य महत्त्वाचे असून आपली शारीरिक क्षमता आणि बौद्धिक क्षमतेचा विकास व्हायचा असेल तर सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे. विविध विचारांची पुस्तके सतत आपल्या उशाला असणे काळाची गरज असून पुस्तकाशिवाय मस्तक सुधारत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये ध्येय प्राप्ती केल्याशिवाय थांबू नका. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा,घटनांचा किंवा दुःखांचा परिणाम आपल्या ध्येयावरती न होऊ देता छत्रपती शिवरायांप्रमाणे आपली प्रतिज्ञा पूर्ण करणे खऱ्या अर्थाने शुराचे, वीराचे लक्षण आहे. तरुणांनी हे कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे असेही विशाल सुर्यवंशी यांनी सांगितले कार्यक्रमाची प्रास्ताविका शंकरराव खापे यांनी केली तर आभार प्रदर्शन विजय पाटणे यांनी व्यक्त केले.
Comments
Post a Comment