कोरेगांवचे रणजित देशमुख यांची सैन्यदलात लेफ्टनंटपदी पदोन्नती.
कोरेगांव (प्रतिनिधी) आज्जू मुल्ला.
दि. ६ : येथील डी. पी. भोसले कॉलेजचे माजी विद्यार्थी व खडकवासला, पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) कनिष्ठ अभियंता रणजित आनंदराव देशमुख यांची सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे.
भारतीय सैन्य दलाच्या डेहराडून येथील राष्ट्रीय सैन्य अकादमीतून रणजित यांनी नुकतेच प्री कमिशनींग ट्रेनींग पूर्ण करुन त्यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. शनिवारी दि. ३ डीसेंबर रोजी डेहराडून येथे त्यांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. या नियुक्तीनंतर आता ते मणीपूर येथे सहाय्यक गॅरिसन अभियंता या पदावर रुजू होणार आहेत. खटाव तालुक्यातील सिध्देश्वर कुरोली हे मुळ गाव असलेल्या रणजित देशमुख यांचे आजोबा धनपाल पांडुरंग देशमुख व वडील आनंदराव धनपाल देशमुख यांनीही भारतीय सैन्यदलात सेवा केली आहे, घरातून सैन्य सेवेची परंपरा लाभलेल्या रणजित यांचे प्राथमिक शिक्षण सिध्देश्वर कुरोली येथे, माध्यमिक शिक्षण कोरेगांवच्या दि मॉडर्न हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण डी. पी. भोसले कॉलेज मध्ये झाले. पहिल्यापासूनच अभ्यासाची प्रचंड आवड असलेल्या रणजित यांना देशसेवा खुणावत होती. विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात शिकत असतानाच त्यांची सैन्य दलात निवड झाली, त्यानंतर ते बॉम्बे इंजिनीअरींग ग्रुपमध्ये दाखल झाले. सुरुवातीच्या काळात त्यांनी गुवाहाटी, डीब्रुगढ (आसाम) येथे सेवा केल्यानंतर जम्मु काश्मिरच्या राष्ट्रीय रायफल्स मधून कुपवाडा या अतिसंवेदनशील विभागात शौर्य दाखवले. २००६ पासून सलग तीन वर्षे त्यांनी सैन्यदलातील पदोन्नतीसाठी लष्करी महाविद्यालयातून प्रशिक्षण पूर्ण केले मात्र तेथे संधी हुकल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने सराव व सातत्यपूर्ण अभ्यास करत सैन्य दलातील कनिष्ठ अभियंता पदासाठीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. २०११ मध्ये त्यांनी पुण्याच्या कॉलेज ऑफ मिलीटरी इंजिनीअरींग येथून प्रथम क्रमांकाचे सुवर्णपदक मिळवत स्थापत्य अभियंत्याचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर भारतीय वायु सेनेच्या नलिया (गुजरात) येथील वायुदल विभाग, बनिहाल (जम्मु काश्मीर) येथील मिलीटरी इंजिनीअरींग सव्हीर्सेस विभागात कनिष्ठ अभियंता पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. सैन्य दलात मिळविलेल्या गुणवत्तेच्या जोरावर पुढे त्यांना पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधीनीत कनिष्ठ अभियंता म्हणून २०१९ ते २०२२ या कालावधीत काम करण्याची संधी मिळाली. तेथूनच त्यांनी सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षेची तयारी सुरु केली, याच काळात त्यांनी पिंपरी, पुण्याच्या डी. वाय. पाटील कॉलेज मधून बॅचरल ऑफ बिझनेस एडमिनीस्ट्रेशन (बीबीए) एचआर ची पदवी मिळविली. त्यानंतर पुण्याच्याच एम.आय.टी. कॉलेज मधून कन्स्ट्रक्शन ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या पदवीसाठीही प्रवेश घेतला. गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी बेंगलोरच्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड परीक्षेत यश मिळवून भारतीय सैन्य दलाच्या डेहराडून येथील राष्ट्रीय सैन्य अकादमीत प्री कमिशनींग ट्रेनींगसाठी प्रवेश मिळविला. तेथील प्रशीक्षण यशस्वीरित्या पूर्ण करुन रणजित देशमुख यांची नुकतीच लेफ्टनंटपदी पदोन्नती झाली असून त्यांच्या या सातत्यपूर्ण यशाचे कुटुंबीयांनी भरभरुन स्वागत केले आहे डेहराडून येथे नुकत्याच पार पडलेल्या शपथग्रहण सोहळ्यास रणजित यांच्या आई-वडीलांसह पत्नी, मुले व नातेवाईकांची उपस्थिती होती. त्यांचे बंधु युवा संघटक किरण आनंदराव देशमुख, मितेश देशमुख यांच्यासह श्रीराम गणेश मंडळ व ज्येष्ठ नागरिक संघटना आणि मित्र परिवार कोरेगाव यांच्या वतीने श्रीरामनगर येथे रणजित यांच्या लेफ्टनंटपदी झालेल्या निवडीचा जल्लोष करण्यात आला.
*निश्चित ध्येय बाळगून मिळविले यश : रणजित देशमुख*निश्चित ध्येय आणि अभ्यासात सातत्यपूर्ण कामगिरी ठेवल्यास यश हमखास मिळते हे मी कृतीतून सिध्द करुन दाखविले आहे, माझ्या या यशात आई, वडील, गुरुजन व नेहमी ऊर्जा बनून सोबत राहिलेल्या पत्नी सौ.सरला देशमुख यांच्या सह मित्र परिवाराचे मोठे योगदान असल्याचे निवडीनंतर बोलताना रणजित देशमुख यांनी सांगितले.
Comments
Post a Comment