शहीद जवान विपुल इंगवले अमर रहे च्या जय घोषणाने भोसे ता .कोरेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
भारतीय सैन्यदलात सियाचीन ग्लेशियरमधे (बर्फाच्छादित प्रदेशात) कार्यरत असताना बर्फ लागून प्रकृती बिघडल्यामुळे उपचार सुरू असताना पुणे येथील कमांड हॉस्पिटलमधे काल सकाळी वीरमरण आलेल्या भोसे (ता. कोरेगाव) येथील जवान विपुल इंगवले यांच्यावर आज दुपारी शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणामधे अंत्यसंस्कार करण्यात आले.
भोसे फाट्यावर हुतात्मा विपुल यांच्या हौतात्म्याबद्दल आदरांजली वाहनारा फलक, रस्त्याचा दोन्ही बाजूने रांगोळी रखाटली होती. सकाळी साडेअकर वाजता विपुल यांचे पार्थिव यामार्गे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. प्रारंभी निवासस्थानी पोलीस व लष्करी जवानानी सलामी दिली. त्यानंतर पार्थिव (शवपेटी) घराच्या दारात अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आले. त्यानंतर "हुतात्मा जवान विपुल इंगवले अमर रहे" च्या जयघोषात त्यांचे पार्थिव सजवलेल्या ट्रकमध्ये पाठीमागे हौद्यात उंचावर तयार केलेल्या व्यासपीठावर ठेवण्यात आले. त्यानंतर ही अंत्ययात्रा हजारो युवक, ग्रामस्थांच्या सहभागाने पुढे निघाली. रस्त्याच्या दुतर्फा शेकडो महिला वर्ग साश्रूनयनाने आपल्या गावच्या हुतात्मा सुपुत्राला निरोप देत होत्या. त्यामधे ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यातही अश्रू तरळत होते.
अंत्ययात्रा संपूर्ण गावातून फिरून मुख्य चौकात आल्यावर तेथे हजारो नागरिकांच्या उपस्थितीत छोटीखानी श्रद्धांजली सभा झाली. तेथून अंत्ययात्रा थेट स्मशानभूमीत गेली.
स्मशानभूमीत पार्थिवावर प्रारंभी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे, माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, सरपंच गणेश भोसले, उपसरपंच अजित माने, गावचे सुपुत्र कर्नल अमित माने, प्राचार्य डॉ. विजयसिंह सावंत, प्रांताधिकारी ज्योती पाटील, नायब तहसीलदार सारिका शिंदे, पोलीस उपअधीक्षक नितीन देशमुख, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सहायक पोलिस अर्चना शिंदे, डॉ. राजेंद्र जाधव, प्रवीण घोरपडे, कामांडिंग ऑफिसर माळी, प्रा. बाळकृष्ण भोसले, संतोष निंबाळकर, महादेव झांजूर्ने, अशोक नलवडे, रतिकांत शिर्के आदींनी पुष्प चक्र वाहून आदरांजली वाहिली.
या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार महेश शिंदे यांनी हुतात्मा विपुल इंगवले यांच्या वीर मरणाबाबत दुःख व्यक्त करून भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.
शेवटी पोलीस दल आणि लष्करी जवानांनी पार्थिवाला मानवंदना व हवेत गोळ्या झाडून सलामी दिल्यानंतर हुतात्मा विपुल यांच्या पार्थिवावाला त्यांचे बंधू विशाल यांनी पार्थिवावाला अग्नी दिला. या वेळी 'हुतात्मा जवान विपुल इंगवले अमर रहे"च्या जयघोषाने आसमंत दुमदुमून गेले.
Comments
Post a Comment